Monday, January 16, 2017

// // Leave a Comment

महाराष्ट्रात तीन शिवजयंती उत्सव का होतात?


छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन वेगवेगळ्या दिवशी साज-या केल्या जातात. त्या का यांची माहिती...
१.बखरकारांनी निर्देशित केलेली वैशाख शुद्ध पंचमी शके १५४९ ही शिवजन्मतिथी इतर पुरावे मिळेपर्यंत संशोधकांनी प्रमाण मानली होती. काही पुराणमतवादी नवीन जन्मतिथी पुराव्यांशी सहमत नाहीत. म्हणून ते लोक त्या तिथीला शिवजयंती उत्सव करतात.
२.जेधे शकावलीनुसार फाल्गुन वद्य तृतिय शके १५५१ ही शिवजन्मतिथी बहुतांशी जुन्या नव्या संशोधकांना मान्य आहे. शिवकाळात इंग्रजी कालगणना हिंदुस्तानात प्रतलीत नव्हती. शिवराय हिंदूधर्माभिमानी होते. प्रभु रामचंद्र भगवान श्रीकृष्ण या सारख्या दैवतांत शिवरायांचे स्थान मानुन हिंदुधर्माभिमानी बहुतांशी या तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करतात.
३. सध्या हिंदुस्थानच्या सर्व सरकारी, नीम सरकारी, नागरी, आर्थिक, शैक्षणिक कारभार इंग्रजी कालगणनेनुसार चालतो. या देशांतील दिनदर्शिका इंग्रजी कालगणनेनुसार तयार केल्या जातात. ३७५ वर्षापूर्वी फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ ही हिंदु कालगणनेची शिवजन्म तिथी, इंग्रजी कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी आली होती. ती सरकारमान्य केली गेली. म्हणून सरकार व त्याच्याशी संबंधीत निरनिराळी अनुशासनालये यांच्यात एक वाक्यता राखण्यासाठी १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. तो शासकीय संमत सार्वजनिक सुट्टीचा असतो.
(अप्पा परब यांच्या ‘ शिवजन्म ’ या पुस्तकामधून साभार)
Read More

Tuesday, December 13, 2016

// // Leave a Comment

Introduction

Shivaji British Museum.jpg

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणार्‍या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
Read More
// // Leave a Comment

महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला?


रणजीत देसाई यांच्या ‘ श्रीमान योगी ’ या पुस्तकाची नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेली प्रस्तावना ही शिवचरित्राचे  महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. याच प्रस्तावनेत कुरुंदकरांनी महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला ते सांगितले आहे. तो भाग या प्रस्तावनेतून जसाच्या तसा.


इ. स. १६७४ ला शिवाजी राजांनी  स्वतःला राज्याभिषेक करण्यासाठी हजार प्रयत्न करून, आपले क्षत्रियत्व त्यांनी  सिद्ध केले. मुंज केली. प्रायश्चित्तं घेतली. स्वतःच्या पत्निंशीच नव्याने लग्ने केली. अभिषेकाचा इतका खटाटोप शिवाजीने का केला असा एक प्रश्न आहे.

बेंद्रे यांचे म्हणणे असे की, ब्राह्मण गुन्हेगारांना शासन करणे, धार्मिक प्रश्नावर निकाल देणे हा अधिकार यावा म्हणून शिवाजीने राज्याभिषेक करून घेतला. माझे म्हणणे असे की, तो काळ धार्मिक प्रभाव आणि वर्चस्वाचा काळ होता . हिंदू धर्मशास्त्रांप्रमाणे  राज्याभिषेकाला पावित्र्य आणि प्रतिष्ठा आहे. राज म्हणजे मुसलमान, ही त्यावेळची समजूत आहे.
दिल्लीपती हा सर्व भारताचा स्वयंभू सम्राट मानला जाई. यामुळे बहामनी घराणे वैभवात असतानाही जनतेला व खुद्द बहामनी वजीरांना आपल्या राज्याचा सम्राट दिल्लीपती व त्याचा अधिपती इराणच खलीफा वाटे. भारताचे अधिपत्य मिळाल्यानंतरही हे अधिपत्य इराणकडून मान्य करून घेणे अल्लाउद्दिनला इष्ट वाटले.

औरंगजेबाच्या वेळी खलीफा तुर्की होता. त्याची मान्यता आपल्या अधिपत्याला मिळावी याचा अटोकाट प्रयत्न आलमगीरने केला. शेवटी ती मिळाली तेव्हा, आनंदोत्सव दरबार केला. आदिलशाही, कुतुबशाही, राजांना व सरदारांनासुद्धा दिल्लीपती हा आपल्या पादशाहीचा सम्राट वाटे.

शिवाजीच्या वेळी अनेक राजपूत राजे होते. त्यांचे मंचकारोहण होई व तख्तनशीनीचा समारंभही होई. राज्याभिषेक नव्हता. विजयनगरचे साम्राज्य स्थापन झाले. वैभवाला चढले. पण वैदिक विधिपूर्वक राज्याभिषेक नाही. इ. स. १००० च्या नंतर हा वैदिक विधीच लुप्त झाला होता.

गागाभट्टाने धर्मग्रंथ पाहून तो नव्याने सिद्ध केला व शिवाजीला राज्याभिषेक केला. ही एक क्रांतिकारक घटना होती. एकीकडे राम, नल, युधिष्ठिर, विक्रमादित्य या परंपरेशी या कृतीने शिवाजी आपला सांधा जोडीत होता. दुसरीकडे अखिल भारतातील हिंदुंच्या धर्मनिष्ठा व धर्माचे सारे पूज्यत्व व पावित्र्य स्वतःमागे उभे करीत होता.

आमच्या धर्मशास्त्राप्रमाणे सत्य युगात चार वर्ण असतात. द्वापारयुगात वर्णसंकराला आरंभ होतो.
त्रेतायुगात तीन वर्ण राहून संकर वाढतो.कलीयुगात ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण राहतात.
आमच्या पुराणांप्रमाणे नंद घराणे संपले आणि क्षत्रिय संपले. तिथून पुढे शूद्रराजे आरंभ झाले. शिवाजी जणू इतिहासाचे चाक मुस्लीम पूर्व जागेपर्यंत मागे सरकवून हिंदुंच्या वेदपुराणांचा, स्मृतींचा व सर्व हिंदू वैभवाचा स्वतःशी सांधा जोडून नवे युग सुरू झाल्याची द्वाही फिरवू इच्छित होता. शिवराज्याभिषेकाकडे तात्कालिक सोयीचा भाग म्हणून न पाहता, त्या मागची भव्यता समजून घेतली पाहिजे. अभिषेक-विधी बेंद्रे यांनी संपादन केला आहे. आपण आपल्या कादंबरीत या प्रसंगाची सर्व भव्य पवित्र भूमिका ठसठशीतपणे मांडावी असे मला वाटते.
स्वतःला वैदिक मंत्रांनी अभिषिक्त करून घेण्याची कल्पना शिवाजीच्या मनात केव्हापासून आली असावी ? मला वाटते, ती फार पूर्वीपासून असावी. कारण त्याने प्रधानाचा शिक्का असा घेतला आहे - शिवनगरपती हर्ष निधान सामराज मतीमत् प्रधान. हा शिक्का १६५३ पासूनचा आहे. यातील हर्षनिधान या विशेषणाला संस्कृत काव्य वाड्मयाची पार्श्वभूमी आहे. अभिषिक्त राजा म्हणजे सर्वांस अभय व न्यायाची हमी, प्रजेच्या नियमांची व सुखाची हमी. मात्सन्यायातील दुःखांपासून प्रजेची सुटका, अशी वर्णने कौटिल्यापासून आहेत. काव्यातही आहेत. अर्थात हे एक माझे अनुमान.
Read More

Saturday, November 26, 2016

// // Leave a Comment

श्रीशिवराय स्मारक

शिवाजी महाराजांच्या मुंबईच्या समुद्रातील स्मारकावर महाराष्ट्रात बरंच वादळ घोंगावतयं. पण या स्मारकावरुन होणारा गोंधळ काही नवीन नाही.
आणिकही धर्मकृत्ये चालती। आश्रित होउनि कितेक असती।
धन्य धन्य तुमची कीर्ति। विश्वी विस्तारली।।
समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सतराव्या शतकात केलेले हे वर्णन. काळाच्या ओघात संदर्भ बदलल्याने अनेक वर्णने अर्थहीन बनतात.
परंतु ' आश्रित होउनि कितेक असती ' हे वर्णन मात्र चारशे वर्षांनंतरही कित्येकांस लागू पडते. अशा मानसिकदृष्ट्या आश्रित असलेल्या आमदारांनी गुरुवारी विधान परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक करण्याच्या प्रश्ानवरून गदारोळ घातला व अखेर कमजोर सरकारकडून आश्वासनही मिळवले. शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधी पक्षांनी आपापली दुकाने चालवण्यासाठी जितका केला , तितका अन्य कुणा राष्ट्रपुरुषाचा केला गेला नसेल. शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक करण्यासाठी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारच्या काळात एक समिती नेमण्यात आली.
या समितीने 1999 मध्ये अहवाल सादर केला खरा , पण दरम्यान युतीची सत्ता जाऊन विलासराव देशमुख यांचे सरकार सत्तेवर आले. समितीच्या अहवालावर विचार करण्यासाठी विलासरावांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती नियुक्त झाली. या समितीने शिवरायांचेे स्मारक मुंबईत करण्याऐवजी ते रायगड किंवा शिवनेरीवर करावे , असे सुचवले. शिवाजी महाराजांचे नाव घेताच ज्यांचे बाहू फुरफुरू लागतात , अशा मंडळींचे यामुळे पित्त खवळणे स्वाभाविकच आहे. वास्तविक विलासरावांच्या समितीचा निर्णय कटू असला , तरी योग्यच म्हणावा लागेल.
मुंबईत शिवाजी महाराजांचे तीन अश्वारूढ पुतळे आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ व मध्य रेल्वेचे मुख्य स्टेशन बोरीबंदर यांना शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे नाव बदलून त्यालाही महाराजांचे नाव देण्यात आले. याखेरीज छोटी-मोठी स्मारके आहेतच. याहून आणखी स्मारक करायचे म्हणजे काय करायचे ? चौकाचौकात पुतळे उभारल्याने चिमण्याकावळ्यांचीच सोय होते व इमारती आणि रस्त्यांना नावे देऊन आद्याक्षरांचे शॉर्टफॉर्म होऊन थोर नेत्यांच्या स्मरणापेक्षा विस्मरणच अधिक होते. पण शिवराय गेल्यानंतरही त्यांचेच आश्रित होऊन आपली उपजीविका करणाऱ्यांना इतके भान कुठले ? त्यामुळेच विधान परिषदेत गदारोळ झाला व अखेर सामान्य प्रशासन राज्यमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांना या समितीच्या शिफारशींचा पुर्नविचार करण्याचे आश्वासन द्यावे लागले.
म्हणजे आता आणखी एका समितीची सोय झाली. हे असे किती काळ करून जनतेची फसवणूक करत राहणार ? शिवाजी हा रयतेचा राजा. आज महाराष्ट्रातील रयत एका बाजूला दुष्काळ व वीज टंचाई आणि दुसऱ्या बाजूला भयानक बेकारी यांच्या दुष्टचक्रात पिसून निघत असताना , शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालवणारे मात्र त्यांच्या स्मारकाचे लोणी कसे खाता येईल , याचाच विचार करत राहिले आहेत. छत्रपती आज असते , तर आपल्या स्मारकाच्या मागणीसाठी सभागृहाचा वेळ फुकट घालवणाऱ्यांनाच मणामणाच्या बेड्या घालून त्यांचा कडेलोट करण्याच्या आज्ञा त्यांनी दिल्या असत्या.
ज्यांना छत्रपतींच्या स्मारकाचा इतका कळवळा आला आहे , त्यांनी एकवार शिवनेरीवर किंवा पायात त्राण आणि उरात दम असल्यास रायगडावर जाऊन यावे. शिवस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक वास्तूंची जी परवड झाली आहे , ती नजरेखालून घालावी. शिवनेरीची अवस्था इतकी वाईट की , गडावर एकही माहिती फलक नीट अवस्थेत नाही. जे पर्यटक शिवप्रेमाने शिवनेरीवर येतात , त्यांना ठीक माहिती देण्यासाठी एकही अधिकृत वाटाड्या नाही. रायगडाची अवस्थाही फारशी चांगली नाही. या गोष्टी आमदारांना ठाऊक नसतीलच , असे नाही.
पण रायगड वा शिवनेरी अथवा अन्य गड-किल्ले दुरुस्त केल्याने त्यांना काय फायदा ? मुंबईत स्मारक केले , तर त्याची पायाभरणी , उद्घाटन , नंतर दरवषीर् वर्धापनदिन यानिमित्ताने मिरवता येणे शक्य आहे. शिवाय शिवाजी महाराजांसाठी ' लढण्याचे ' भांडवल करून पुढील निवडणुकीत भाबड्या शिवप्रेमींकडे मताचा जोगवाही मागता येईल. राजकारणात राहायचे आणि कायम सत्तेचीच गणिते मांडायची , तर हा विचार योग्यच म्हणावा लागेल. पण आपले लोकप्रतिनिधी शिवाजी महाराजांच्या नावाचेही ' माकेर्टिंग ' करत आहेत , हे जनतेला ज्या दिवशी कळेल , त्या दिवशी या तथाकथित ' राष्ट्रवादीं ' ची ते कशा पद्धतीने संभावना करतील , याचा विचारच केलेला बरा.
समर्थांनी म्हटले की , ' शिवराजाचे आठवावे रूप। शिवराजाचा आठवावा साक्षेप। शिवराजाचा आठवावा प्रताप। भूमंडळी।। ' महाराजांच्या मानसिक आश्रितांना हे उमगले नाही , तर जनताच त्यांना शिवराजांच्या प्रतापाची प्रचीती आणून देईल. थोडक्यात , अद्याप वेळ गेलेली नाही. शिवाजी महाराजांचे ' आंतरराष्ट्रीय ' ख्यातीचे स्मारक मुंबईतच उभारण्याचा दुराग्रह धरण्याऐवजी रायगड , शिवनेरीसारख्या किल्ल्यांची डागडुजी करून ती उत्तम पर्यटनस्थळे बनवावीत व तेथे सैनिकी प्रशिक्षणासारखी व्यवस्था करावी , हेच उत्तम.
Read More

Sunday, December 20, 2015

// // Leave a Comment

छत्रपति शिवाजी महाराज


ब्राम्हणी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही. त्यांचे स्वप्न पुत्र शिवाजींनी पूर्ण केले.

दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला. आदिलशहाने शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली होती. शहाजीराजे बंगळुरात राहत असल्याने जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी मातोश्री जिजाऊसाहेब, दादोजी कोंडदेव, शिवाजीराजे पुण्याला आले. शहाजी राजांनी शिवाजींच्या शिक्षणाची, लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाच्या अभ्यासाची उत्तम व्यवस्था केली होती. शिवाजीराजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीला प्राधान्य दिले. नि:पक्षपाती न्यायव्यवस्था उभारली. मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्त्वाकांक्षा निर्माण केली. पुण्याच्या पश्चिमेला असणार्‍या बारा खोर्‍यांचा म्हणजे पर्यायाने बारा मावळांचा त्यांनी बंदोबस्त केला. जहागिर ताब्यात असली तरी जहागिरीतील किल्ले विजापूरकरांच्या ताब्यात होते. त्यामुळे शिवाजी राजांनी जहागिरीतील किल्ल्यांची डागडुजी केली. वयाच्या १५ व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ‘साम-दाम-दंड-भेद’ यांचा वापर करून कोंढाणा व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले. १६४७ नंतर राजांनी मुरुंबदेव उर्फ राजगड घेतला. शिवाजी महाराजांच्या हालचालींनी शंकित झालेल्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले. शिवाजीराजांनी संभाव्य संकटाला तोंड देण्याची तयारी केली. आदिलशाहाने फत्तेखान या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठविले. मराठ्यांनी फत्तेखानाचा पुरंदरच्या परिसरात समोरासमोरच्या लढाईत पराभव केला. बंगळूर, कंदर्पी, कोंढाणा या किल्ल्यांच्या बदल्यात आदिलशाहाने शहाजीराजांची सुटका केली. या घटनाक्रमांनंतर जहागिरीची व्यवस्था राखण्याकडे शिवजीराजांनी लक्ष दिले. रांझे गावच्या बावाजी भिकाजी गुजर याने बदअंमल केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. १६४६ च्या सुमारासच राजांची मुद्रा पत्रांवर उमटू लागली.


प्रतिपश्र्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। (अर्थ - शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्र्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.)


आदिलशाही दरबारातील अशांत, अस्थिर वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजींनी जावळीचे खोरे चंद्रराव मोर्‍याच्या ताब्यातून जिंकून घेतले व कोकणावरील प्रभुत्वाचा मार्ग खुला केला. प्रतापगड  बांधवून घेतला. सुपे जिंकले, रोहिडा किल्ला जिंकला. त्यानंतर कल्याणचा खजिना लुटला. रायरीच्या डोंगरावर रायगड बांधवून घेतला. १६५७ च्या सुमारास शिवाजींनी कल्याण-भिवंडी जिंकले व तेथे जहाज बांधणीचे काम सुरू करून मराठ्यांच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. उत्तर व दक्षिण कोकणावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने शिवाजींच्या हालचाली चालू असतानाच आदिलशाहाने अफझलखानाची नेमणूक शिवाजींविरुद्ध केली. अफझलखान हा त्या काळातील एक पाताळयंत्री, शक्तिमान, युद्धनिपुण सरदार होता. अफझलखानाने शिवाजींविरुद्ध आक‘मण करताना पंढरपूर, तुळजापूर या धार्मिक क्षेत्रांची हानी केली. शिवाजीराजे त्याला बधले नाहीत. युक्तीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून राजांनी दिनांक १० नोव्हेंबर, १६५९ रोजी त्याला ठार मारले. खानाच्या मृत्यूचा विलक्षण धक्का आदिलशहाला बसला, तर शिवाजीराजांचे नाव भारतभर पसरले. अदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जौहर याने राजांस पन्हाळ्यात कोंडीत पकडले. राजांनी विशाळगडावर युक्तीने पलायन केले. राजांस विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले.


शिवाजीराजे व मुघल -

शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्‍यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्‍या व्यापार्‍यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्का बसला. स्वराज्यात परतताच राजांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांस वीरमरण आले, परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६७० मध्ये राजांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून अमाप द्रव्य स्वराज्यात आणले.

यानंतर मध्ययुगाच्या इतिहासातील आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे दिनांक ६ जून, १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यास काशीचे पंडित गागाभट्ट उपस्थित होते. यामुळे राजे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. तांब्याचा पैसा ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘शिवराई होन’ अशी खास नाणी सुरू केली. ‘मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’ या प्रसंगी रघुनाथपंडित आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांनी राज्यव्यवहार कोश सिद्ध केला. भाषेतील फार्सी शब्दांच्या ऐवजी त्यांना पर्यायी शब्द देण्याची किंवा स्वभाषीय वळण देण्याची छत्रपती शिवाजी राजांची योजना मध्ययुगात नक्कीच अनुकरणीय होती. पंचांग सुधारणेसाठी कृष्णज्योतिषीकडून ‘करणकौस्तुभ’ हा नवा करणग्रंथ सिद्ध केला. राज्यारोहणाच्या घटकेपासून नवा ‘राजशक’ सुरू करण्यात आला.राज्याभिषेकाचा सोहळा पाहून तृप्त झालेल्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन राज्याभिषेकानंतर झाले. यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची स्वारी ‘दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती राहे’ यासाठी हाती घेतली. भागानगरला जाऊन कुत्बशहाची भेट घेतली व आपला राज्यविस्तार दक्षिणेत केला.  दिनांक ३ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी महाराज स्वर्गवासी झाले. 
Read More